करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अशा प्रमुख कार्यालयात सध्या अधिकारी नाहीत. या कार्यालयांचा सध्या प्रभारींकडे पदभार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या महत्वाच्या अधिकाऱ्यांची तालुक्यासाठी कधी नियुक्ती होणार असा प्रश्न निर्माण केला जात असून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांची बदली झाल्यानंतर येथे नवीन तहसीलदार येथे आवश्यक होते. मात्र येथे अजूनही नवीन तहसीलदार आलेले नाहीत. तहसील कार्यालयाचा सध्या विजयकुमार जाधव यांच्याकडे प्रभारी म्हणून पदभार सुरु होता. येथे फलठणचे तहसीलदार येथील अशी चर्चा होती. मात्र त्यांची दुसरीकडे नियुक्ती झाली असल्याचे समजत आहे. त्यानंतर येथे तहसीलदार म्हणून कोण येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. साधारण तीन महिने झाले येथील पदभार हा प्रभारींकडे आहे.
करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे सध्या रजेवर आहेत. त्यामुळे पंचायत समितीचा पदभरही प्रभारी म्हणून राजाराम भोंग यांच्याकडे आहे. सहायक निबंधक दिलीप तिजोरे यांची बदली झाल्यानंतर येथील पदभारदेखील प्रभारीकडे आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे हेही रजेवर आहेत. त्यामुळे येथील पदभारही प्रभारींकडे आहे.
तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया…
आमदार संजयमामा शिंदे
आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, करमाळा तालुक्यातील प्रमुख कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या ऑर्डर अधिवेशन झाल्याबरोबर किंवा आठ दिवसात होतील.
माजी आमदार नारायण पाटील
माजी आमदार नारायण पाटील म्हणाले, सरकारने या महत्वाच्या पदाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने या ही पदे त्वरित भरावीत. येथे त्वरित अधिकारी द्यावेत.
माजी आमदार जयवंतराव जगताप
माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले, करमाळा तालुक्यातील महत्वाच्या कार्यालयात मुख्य अधिकारी येणे आवश्यक आहे. आमदार संजयमामा शिंदे हे येथे चांगले अधिकारी यावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक नागरिकांची कामे रखडत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडीचा यावर परिणाम झाला आहे. मात्र आमदार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे आठ दिवसात अधिकारी येथील असा विश्वास आहे.
(बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनाही संपर्क साधला होता. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.)