करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात नेमके काय चालतंय हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कामासाठी दिलेल्या ‘अपॉईमेंट’ दिवशी कामे होत नसून नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. पैशासाठी कामे लांबवली जात आहेत का? असा प्रश्न केला जात असून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी केली जात आहे.
करमाळा तहसीलदार यांच्याकडे एका व्यक्तीने रेशनकार्डसंगणकीकरण करण्यासाठी ७ नोव्हेंबरला अर्ज केला होता. पुरवठा विभागात हा अर्ज दिल्यानंतर त्यांनी ७ डिसेंबरला हे काम होईल असे सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्ती ७ तारखेला गेली. मात्र त्यादिवशी त्यांचे काम झाले नाही. तेव्हा त्यांना उद्या काम होईल, असे सांगितले. मात्र अद्यापही हे काम झालेले नाही. आठ महिन्यापासून येथे तहसीलदार नव्हते. मात्र गेल्या आठवड्यात येथे शिल्पा ठोकडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला. त्यांनी पदभार घेतल्यानंतर कामे गतीने होतील, अशी अशा सर्वसामान्य नागरिकांना आहे.
७ डिसेंबरला संबंधित नागरिकाने तेव्हाचे प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांना हा विषय सांगितला होता. त्यानंतर त्यांनी कामे वेळेत करण्याची सूचना दिली. दरम्यान संबंधित विभाग प्रमुखाने सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगितले. मात्र त्यानंतर १० दिवस झाले तरी काम का झाले नाही? असा प्रश्न आहे. तेथील अधिकाऱ्याने सर्व्हरचे कारण सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीने तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात पहाणी केली तर तेथील ऑपरेटर जागेवर नसतो. त्याची वेळ निश्चित नसल्याचे समोर आले. यावर विचारणा केल्यानंतर सर्व्हर डाऊनमुळे संबधित कर्मचारी हा रात्री घरातून काम करत असल्याचे सांगण्यात आले. सरकारी काम हे घरातून करता येथे हा प्रश्न आता केला जात असून केवळ पैशामुळेचे कामे लांबवली जात असल्याची तक्रार नागरिकांची आहे.
करमाळा तहसील कार्यालयातील तक्रारीबाबत आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे नागरिकांनी आढावा बैठकीत तक्रार केली होती. तेव्हा अपुरा कर्मचारी असे म्हणत वेळ मारून नेली होती. मात्र त्यानंतर एक कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंतरही कामात सुधारणा झाली नसल्याचे दिसत आहे. ठोकडे यांनी पदभार घेतला आहे. मात्र आता काय सुधारणा होणार का? हे पहावे लागणार आहे. दरम्यान तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, ‘मी येथील पदभार घेतला आहे. आज पुरवठा विभागातील कर्मचारी बैठकीसाठी बाहेर गेले आहेत. ते आल्यानंतर याचा आढावा घेतला जाईल.’
ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले म्हणाले, ‘रेशनकार्ड संगणकीकरण करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सर्व्हर डाऊनच्या नावाखाली कामे लांबणीवर पडत आहेत. पुरवठा विभागाचा कारभार हा लोकविमुख व मनमानीपणे सुरु आहे. ग्रामीण भागातून अनेक नागरिक कामासाठी येतात. सरकारी योजनेसाठी रेशनकार्ड हे महत्वाचे डाक्युमेंट आहे. मात्र सध्या पुरवठा विभागाच्या कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयात एजेंटचा सुळसुळाट आहे. त्यातून कर्मचाऱ्यांना पैसे मिळतात त्यामुळेच कामे लांबवली जात’, असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.