करमाळा (सोलापूर) : स्वयंम संस्कार केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या दृष्टिने गतिमान करण्यासाठी राज्यस्तरीय महाराष्ट्र रिअल टॅलेन्ट सर्च परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेला पश्चिम महाराष्ट्रातून सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. करमाळा तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील 876 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रवेश घेतलेला आहे.
विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंम संस्कार केंद्राच्या वतीने वर्षभर विनामुल्य दररोज एक तास मोफत घेतला जातो. करमाळ्यामध्ये या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 100 च्यावर असून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करमाळ्यामध्ये दररोज एक तास याप्रमाणे तीन बॅचचा मोफत क्लास घेतला जातो. यासाठी महेश क्षीरसागर यांनी क्लाससाठी स्वत:चा हॉल मोफत उपलब्ध करुन दिलेला आहे. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावे व देशाचा इतिहास माहित व्हावा या हेतूने भारताच्या इतिहासावर निबंध लिहून घेत विद्यार्थ्यांची सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्फूासर्त प्रतिसाद दिला. प्रा. उत्तम विटुकडे व प्रा. डॉ. सारिका विटुकडे यांनी यासाठी परिश्रम घेतले.