करमाळा (सोलापूर) : तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. ऑगस्ट संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने उडीद, तुर, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, कांदा, सूर्यफूल, कपाशी करपून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड. राहुल सावंत यांनी केली आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून मोठ्या उमेदीने आर्थिक भार उचलून शेतकर्यांनी शेती मशागत करून पेरणी केली. यावर्षी पाऊस चांगला पडेल व उत्पन्न चांगले येईल अशी अशा होती. महागडी बियाणे व कृषी निविष्ठा खरेदी करून शेतीची मेहनतीने त्याने मशागत केली आहे. परंतु पाऊसच न झाल्याने लागवड वाया गेली व आर्थिक संकटाचा भार पडला. शेतकर्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ॲड. सावंत यांनी केली. हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री धंनजय मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवर, आमदार संजयामामा शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांना देण्यात आले आहे.