करमाळा (सोलापूर) : ‘कोर्टातील केस मागे घे, नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवितो,’ असे म्हणून एकाला काठीने मारहाण करून झाडाला बांधल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात केडगाव येथे घडला आहे. यामध्ये चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सिंधुबाई पंढऱ्या काळे, पंढऱ्या पवण्या काळे, शिरक्या पंढऱ्या काळे (सर्व रा. केडगाव, ता. करमाळा) व अश्या पवार (रा. जामखेड, जि. नगर) अशी हा गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. याप्रकरणात रेण्या पवण्या काळे (वय ३५, रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
केडगाव येथे 27 तारखेला दुपारी २ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. फिर्यादी रेण्या काळे हा चिखलठाण नंबर १ येते एसटीने केडगावात आला. तेव्हा केडगाव येथील एसटी स्टँडवर फिर्यादीचा भाऊ पंढऱ्या व त्याची बायको सुधाबाई त्यांचा मुलगा व जावई हे होते. त्यांनी फिर्यादीला बोलवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
‘तू माझ्यावर केलेली तक्रार मागे घे,’ असे म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा संशयित महिला आरोपी ‘तो असा ऐकणार नाही, आपल्या वस्तीवर घ्या, आपणच ह्याच्यावरती बलात्काराची खोटी तक्रार टाकू,’ असे म्हणाली. त्याला बळजबरीने त्यांनी त्याच्या वस्तीवर ओढत नेले. त्यानंतर हातातील काठीने त्याच्या पायावर मारहाण केली. घराजवळ असलेल्या जनावरांचे दावे घेऊन हातपाय बांधून झाडाला उलटा बांधा असे म्हणत त्यांनी खिशातले अडीच हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी हातपाय बांधून फिर्यादीला घराच्यासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला आडवे बांधले. त्यानंतर त्यांनी त्याला काठीने, गजाने पायावर व कमरेला मारहाण केली. दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान पोलिसांची गाडी आली. तोपर्यंत त्याला तेथेच झाडाला बांधून ठेवले होते. पोलिसांनी त्याला सोडून उपचारासाठी दाखल केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.