करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील लिंबेवाडी येथे रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिक अंतर्गत ज्वारी बियाणे (फुले सुचित्रा) वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच व उपसरपंच तसेच प्रगतशील शेतकरी यांचे हस्ते बियाणे वाटप करण्यात आले. पाऊस मोठा झाला नसला तरी पेरणी होण्याकरता जमिनीमध्ये ओलावा तयार झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून मोठ्याप्रमाणात बियाणे मागणी होती.
यावेळी तालुक्यात सर्वात अगोदर वेळेवर व मुबलक प्रमाणात लिंबेवाडी गावात बियाणे वाटप करण्यात आल्यामुळे सरपंच किरण फुंदे, उपसरपंच व ग्रामस्थ लाभार्थी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कृषी सहाय्यक दादासाहेब नवले यांनी बीज प्रक्रिया करूनच रब्बी हंगाम पेरणी करण्याचे सर्व शेतकरी बांधवांना अवाहन केले. पीक प्रात्यक्षिक अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क करून हेक्टरी 10 किलोपर्यंत मोफत ज्वारी बियाणे घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले आहे.