राजधानी नवी दिल्ली व उत्तराखंडमध्ये आज (मंगळवारी) दुपारी २ वाजून ५१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे जमीन हादरत होती. भूकंप होत असल्याचं समोर येताच नागरिकानी घर व कार्यालयाबाहेर धाव घेतली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार दुपारी २.५१ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी होती.
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंपाचा धक्का साधारणपणे १० सेकंद जाणवला. नेपाळमध्ये देखील आज दुपारी २. २५ मिनिटांनी भूकंप झाला, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. नेपाळमधील भूकंप हा ४.६ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा होता. सर्वसाधारणपणे ५.४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप हा धोकादायक मानला जातो.
भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये असल्याने भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील हे धक्के जाणवले. उत्तर प्रदेशच्या लखनऊ, कानपूर, श्रावस्ती, बरेली, मुरादाबाद, मेरठ आणि गाझियाबाद सारख्या शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नवी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण दिसून आलं.