करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना यावर्षीच्या गाळप ऊसाला टनाला 2 हजार 551 रुपये पहिला हप्ता रोख दिला जाणार आहे. याशिवाय ऊस वाहतूकदारांना रोखीने उस भाडे दिले जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घालावा, असे आवाहन प्रशासक बाळासाहेब बेंद्रे यांनी केले आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ आज (गुरुवारी) झाला. कारखान्याचा 28 वा गळीत हंगाम आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले, आदिनाथ कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे तो कारखाना वाचवणे गरजेचे आहे. सहकारात राजकारण आले की सहकार उद्ध्वस्त होते. साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वतःचे गडबाजीचे स्वार्थी राजकारण करण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाचे राजकारण करणे गरजेचे आहे. या तालुक्यात भैरवनाथ कारखाना असताना सुद्धा आम्ही आदिनाथला मदत करत आहोत. हा कारखाना उभा करण्यासाठी तालुक्यातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी तपश्चर्या केली आहे. हा कारखाना उध्वस्त झाला तर आपली पिढी माफ करणार नाही. यामुळे या कारखान्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस घालावा.
प्रशासकीय संचालक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी हा कारखाना हडप करण्याचा प्लॅन केला होता. त्यांच्या या भूमिकेला करमाळ्यातील काही स्वार्थी राजकारणी मंडळी खतपाणी घालत होते. मात्र आदिनाथ गिळंकृत करणाऱ्यांचे सरकार उध्वस्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार आले आणि आदिनाथ जीवदान मिळाले. आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आदिनाथ कारखाना वाचण्यासाठी मदत केली. 12 कोटी रुपये देऊन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी आदिनाथला मदत केली. संजय गुटाळ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
सुहास गलांडे म्हणाले, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासक मंडळ अत्यंत उत्तमपणे चालवत आहे. २५ वर्षात कोणी किती कारखाना मातीत घातला हा इतिहास शेतकऱ्यांना माहित आहे. त्यामुळे किमान पाच वर्षे हे संचालक प्रशासकीय संचालक मंडळ ठेवावे.