करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) दिल्लीत होणाऱ्या ध्वजारोहणप्रसंगी तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर हे उपस्थित राहणार आहेत. याबाबत त्यांना निमंत्रण आले आहे. केंद्र सरकारच्या 10 हजार FPO स्थापन करण्याच्या उद्दिष्ट नुसार वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनातून व नाबार्डच्या अर्थसहाय्यातून राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना मे 2022 मध्ये झाली. केळीवर काम करण्यासाठी राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात आली.
स्थापनेपासूनच मोठे ध्येय घेऊन कंपनीची वाटचाल वॉटर आणि नाबार्डच्या माध्यमातून सुरू आहे. या कंपनीचे 383 सभासद आहेत. पहिल्या टप्प्यात कंपनीने उत्कृष्ट दर्जाची केळी उत्पादित करण्यासाठी आवश्यक असलेली एसओपी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती केली आहे. माती परीक्षण करणे व त्यानुसार खतांची मात्रा देणे हा उपक्रम कंपनीने सभासदांसाठी सुरू केला आहे. उत्कृष्ट दर्जाची केळी एक्सपोर्ट करण्याचे राजे रावरंभा कंपनीने उद्दिष्ट ठेवलेले आहे.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 1 कंटेनर दुबईला एक्सपोर्ट केला. निर्यात क्षेत्रामध्ये दर्जेदार काम करणाऱ्या कंपन्यांची डीलरशिप घेऊन त्या कंपन्यांना केळी पुरवठा करण्याचे कामही राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीने सुरू केले. सभासदांसाठी माती परीक्षण, खत परीक्षण, ॲग्री मॉल, केळीची रोपे, जैन ठिबक, सह्याद्री कंपनीची विद्राव्य खते कंपनीकडून सभासदांना माफक दरात उपलब्ध करून दिली जातात. कंपनीच्या या कामाची दखल केंद्र सरकारच्या वतीने 15 ऑगस्टला ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहण्याबद्दलचे निमंत्रण कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर आणि त्यांच्या पत्नी स्वाती वीर यांना आले आहे.
पंतप्रधान मोदी यांचे आभार : डॉ. वीर
डॉ. वीर म्हणाले, आमच्या नवीन कंपनीला प्रेरणा देण्यासाठी आणि कंपनीची वाटचाल समजून घेण्यासाठी देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण होणाऱ्या दिल्ली येथील ध्वजारोहण समारंभासाठी चे निमंत्रण भारत सरकारकडून आम्हाला आलेले आहे. 14 तारखेला सकाळी आम्ही दिल्ली येथे पोहोचत आहोत आणि 16 तारखेला दिल्ली येथून परत येणार आहोत. या 3 दिवसांमध्ये ध्वजारोहण समारंभाबरोबरच केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशीही चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कंपनीच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी हा दिल्ली दौरा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार.