करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीवरील संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या पाटबंधाऱ्याची दारे व इतर साहित्य आज (बुधवारी) चोरीला गेले. तेथील शेतकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित चोरटयांनी त्यांच्याच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगासवधनता बाळगत स्वतःचा जीव वाचवत त्यांनी त्या गाडीचा नंबरही घेतला. हा सर्व प्रकार संबंधित अधिकाऱ्याला घसा कोरडा पडेपर्यंत शेतकरी सांगत होते. पण निष्काळजी आणि बेजबाबदार अधिकारी मात्र चोरी झाली हे मान्य करायलाच तयार नव्हता ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हजारो रुपये पगार घेतो त्यांना खोटे ठरवण्याचा डाव मात्र ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष ऍड. शशिकांत नरुटे यांनी हाणून पडला आणि शेवटी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पहाणी करून पंचनामा करत चोरी झाल्याची कबुली दिली आहे.
काय आहे प्रकार?
बुधवारी आज (ता. 14) पहाटे 5 ते 6 वाजताच्या दरम्यान एका पीक अपमधून (MH16Q6605) संंगोबा पाटबंधारेच्या चौकीतून पाणी अडविणारे दरवाजे चोरीला गेले. खांबेवाडी येथील शेतकरी सुंदरदास हाके व गोपीनाथ मारकड हे मॉर्निग वॊकला गेले होते. तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ ऍड. नरुटे यांना याची माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र संबंधित पिकअप मार्गस्थ झाला होता. शेतकऱ्यांनी तो पिक अप पाठलाग करून अडवण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्या अंगावर पिकअप आल्याने ते बाजूला झाले. दरम्यान त्यांनी गाडीचा पाठलाग करून नंबर घेतला. यापूर्वीही या भागात याच बंधाऱ्याची सुमारे 25 ते 30 दरवाजे चोरीला गेले होते, असे ऍड. नरुटे यांचा दावा आहे. संगोबा बंधाऱ्याला चौकीदार नाही. येथे चौकीदार ठेवणे अपेक्षित आहे. दरवाजे चोरीला गेले तर भविष्यात पाऊसाचे पाणी बंधाऱ्यात अडविता येणार नाही.
चोरी झालीच नसल्याचा सुरुवातीला अधिकाऱ्याचा दावा
‘करमाळा समाचार’ने दिलेल्या वृत्तानुसार संगोबा येथील बंधार्यावर अधिकार्यांनी पहाणी केली. मात्र तेथे चोरीच झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आहे. या प्रकारात अॅड. नरुटे यांनी ऐकीव माहिती दिली का? असा प्रश्न केला जाऊ लागला होता. मात्र अॅड. नरुटे यांनी या प्रकरणासाठी सोलापूर येथील अधिक्षक श्री. जाधवर, उप अधिक्षक संजय अवताडे यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान त्यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहीते पाटील व गोपीचंद पडळकर यांनाही याची माहिती दिले. आणि सर्व सुत्रे हालली व चोरी झाल्याचे कबुल करण्यात आले.
पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु
अॅड. नरुटे यांनी पाठपुरावा केल्यामुळे जे बेजबाबदार अधिकारी चोरीच झाली नाही, असे सांगत होते त्यांनी संबंधित ठिकाणी पोलिस पाटीलाला बरोबर घेऊन पंचनामा केला. त्यात १५०० किलोचे भंगाराचे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले असल्याचे श्री. जुंडरे यांनी ‘काय सांगता’ न्युज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
अधिकार्यांच्या संगनमतानेच हे घडले असल्याचा आरोप
संगोबा बंधारा येथे चोरी झाल्याचा प्रकार शेतकर्यांनी पाहिला. मी स्वतः संबंधीत गाडीचा पाठलाग केला. हे वास्तव असताना श्री. जुंडरे यांना याची माहिती दिली. पण त्यांनीच याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी व आमदार मोहिते पाटील, पडळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांना याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनाही माहिती दिली. मात्र पाटबंधारे विभागाचे काही कर्मचारी यांचाच यात हात असल्याचा संशय आहे. त्यांच्या संगनमतानेच हा प्रकार झाल्याचा आरोप अॅड. नरुटे यांनी केला असून सुरुवातीला चोरीच झाली नाही, असे म्हणणार्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.