करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील मराठी विभागाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रा. प्रमोद शेटे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची सद्कालीन प्रस्तुतता’ या विषयावर व्याख्यान झाले. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल्. बी. पाटील होते. कार्यक्रमास वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे व कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संभाजी किर्दाक उपस्थित होते.
प्रा. शेटे यांनी शिवचरित्राच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. ‘जमिनीची मगदुराप्रमाणे मोजणी करून शेतसारा आकारणारे शिवाजी महाराज हे पहिले राजे होते. रयतेचे राज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाहीची सोपी व्याख्या शिवाजी महाराजांनी केलेल्या लोक कल्याणकारी राज्यकारभाराची फलश्रुती आहे. आधी लगीन कोंडाण्याचं हा वाक्प्रचार आजसुद्धा आपणास आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय या लोकशाहीच्या पायाभूत तत्वज्ञानाची पूर्वपीठिका आपणास शिवचरित्रातच पाहावयास मिळते म्हणूनच छत्रपती शिवराय हे आजही अनुकरणीय आहेत आणि त्यांच्या चरित्रातील किमान एक तरी पैलू आपण आचरणात आणणे हे आजघडीला प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य ठरते’ असे प्रा. प्रमोद शेटे यांनी संगीतले.
आर्यन रोकडे या बालकानेही यावेळी भाषण केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी आजची युवा पिढी शिवाजी महाराजांसारखे दिसण्याचा प्रयत्न करते पण त्यांच्या विचारांप्रमाणे वागताना दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नितीन तळपाडे यांनी केले. सूत्रसंचालन अनिता देशमुख यांनी तर प्रा. मुन्नेश जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.