करमाळा (सोलापूर) : तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेल्या 71.5 किलोमीटरच्या 2 रस्त्यांसाठी हायब्रीड अन्युटी (हॅम) अंतर्गत 270 कोटी 81 लक्ष 88 हजार 868 निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
आमदार शिंदे म्हणाले, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये हॅम अंतर्गत 71.5 किलोमीटरचे 2 रस्ते विकसित करण्यासाठी आपण सुचविले होते. त्यातील केतुर नं 2 – केतुर नं.1 – वाशिंबे सोगाव – राजुरी – सावडी ते जिल्हा हद्द हा 8.50 किमी चा रस्ता तसेच सावडी, राजुरी ,पोंधवडी ,विहाळ, अंजनडोह, झरे, कुंभेज, कोंढेज ,निंभोरे ,मलवडी, केम, उपळवटे, दहिवली, कन्हेरगाव ते वेणेगाव हा 63 कि.मी लांबीचा रस्ता अशा एकूण 2 रस्त्यासाठी 270 कोटी 81 लक्ष निधी मंजूर झाला असून याचा फायदा करमाळा तालुक्यातील 11 व माढा तालुक्यातील 4 अशा एकूण 15 गावांसाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.
या रस्त्यासाठी प्रति किमी जवळपास 4 कोटी निधी मंजूर झाला असून संपूर्ण रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण केले जाणार आहे. सदर रस्त्याची निविदा 11 मार्चला प्रसिद्ध झाली आहे. एप्रिल अखेरपर्यंत सदर कामाची निविदा खुली केली जाईल. सदर कामामुळे करमाळा तालुक्यातील दुर्लक्षित असलेली गावे एकमेकांना जोडली जातील. त्याचबरोबर ती राष्ट्रीय महामार्गालाही जोडली जाणार आहेत. अ.नगर जिल्हा ते सोलापूर जिल्हा असा हा 2 जिल्ह्यातील गावांना जोडणारा अतिशय जवळचा मार्ग यामुळे तयार होणार आहे.