करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही. त्यात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मात्र उमेदवारी जाहीर करून जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्यांच्या प्रचारार्थ महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आज एकत्रित बैठक झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यापूर्वी दादांनी करमाळ्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीही घेतल्या. या भेटी दरम्यान माजी आमदार प्रशांत (मालक) परिचारक यांनी पालकमंत्री पाटील यांच्या समोरच ‘सत्कारा’वरून आमदार संजयमामा शिंदे यांचा उल्लेख करत केलेले विधान चर्चेत आले आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आमदार संजयमामा शिंदे यांच्या विठ्ठल निवास या संपर्क कार्यालयात आले. तेथे आमदार शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान पाटील यांनी आमदार शिंदे यांना जयश्रीराम म्हणत गुडीची प्रतिकृती भेट दिली. चंद्रकांतदादांचा प्रमुख सत्कार झाल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचाही आमदार शिंदे यांनी सत्कार केला. त्यानंतर प्रशांत मालक यांचा सत्कार राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी केला. शाल व पुष्पगुच्छ देत आव्हाड हे सत्कार करत असतानाच प्रशांत मालक म्हणाले, ‘मामा आणि आम्ही विजय होईपर्यंत सत्कार घेणार नाही.’ मात्र तोपर्यंत आव्हाड यांनी प्रशांत मालक यांच्या खांद्यावर शाल टाकली. त्यानंतर पुष्पगुच्छ देत असताना प्रशांत मालक मामांच्या बाजूला सरले.
प्रशांत मालक हे आमदार मामांच्या बाजूला होत असतानाच म्हणाले, ‘मामा आणि मी दुसऱ्याचा बरोबर सत्कार करतो’. त्यावर पालकमंत्री चंद्रकांत दादाही हसत हसत फक्त म्हणाले ‘करेक्ट कार्यक्रम’. प्रशांत मालक यांनी आमदार शिंदे यांचे नाव घेत ‘आम्ही दुसऱ्याचा बरोबर सत्कार करतो’ हे केलेले विधान राजकीय मानले जात अप्रत्यक्षपणे त्यांनी मोहिते पाटील यांनाच तर टोला लगावला नाही ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या सत्कारवेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, भाजपचे सुनील केदार, बबनराव मुरूमकर, लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, बिटरगाचे माजी सरपंच संतोष वाघमोडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुकाध्यक्ष रामा ढाणे आदी उपस्थित होते.
माढ्याच्या उमेदवारीवरून भाजपमधील मोहिते पाटील हे बंडखोरी करतील अशी शक्यता आहे. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार निंबाळकर यांच्या उमेदवावरून मोहिते पाटील नाराज आहेत. त्यांच्या विरोधात भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी दंड थोपटले आहेत. माढ्यातून त्यांनी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. त्यात परिचारक यांनी मामांचा उल्लेख करत केलेले विधान राजकीय मानले जात असून त्यांनाच हा टोला असल्याचे मानले जात आहे.