करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेत अनेकदा अधिकारी व कर्मचारी हजर नसतात. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘हालचाल बुक’ ठेऊन त्यात कोण कोठे गेले आहे, याची नोंद करावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन घोलप यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना केली आहे.
माजी नगरसेवक घोलप म्हणाले, करमाळा शहरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचत आहे. घाणीचे साम्राज निर्माण झाले आहे. स्वच्छता केली जात नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत नगरपालिकेत गेल्यानंतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोण- कोठे गेले आहे याच्या नोंदी नागरिकांना पहायला मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी हालचाल बुक ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याकडे लक्ष दिले नाही, तर आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.