करमाळा (सोलापूर) : हिंगणी येथे भरदिवसा घराची कडी कोयंडा व कुलूप तोडून सोन्याचे गंठण, झुबे, अंगठी, बदाम व रोख रक्कम असा १ लाख ३५ हजाराचा ऐवज चोरटयांनी लंपास केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये देविदास नाना मोरे (वय ७०, रा. हिंगणी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरटीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘आम्ही शेतात रहातो. ९ जानेवारीला सकाळी १० वाजता मी व पत्नी घर बंद करून पुण्याला गेलो होतो. सायंकाळी ६ वाजता काम संपवून घरी आलो. तेव्हा घराचे कुलूप व कडी तोडलेली दिसली. आतमध्ये पाहिले तर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाट पाहिले तर रोख रक्कम व सोन्याचे दागिने नसल्याचे दिसले’. याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.