करमाळा (सोलापूर) : माथाडी कायदा संपुष्टात आणणारे परिपत्रक मागे घ्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व हमाल पंचायतचे करमाळा तालुकाध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदनही दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील विविध हमाल तोलार कामगार संघटनेच्या वतीने राज्याचे कामगार नेते डॉ. बाबा आढाव, नरेंद्र पाटील व इतर कामगार संघटनेचे नेते मुंबई येथील आझाद मैदानावर माथाडी कायदा वाचवण्यासाठी व माथाडी कायदा सुधारण्याच्या नावाने आणलेले विधेयक हे माथाडी कामगार विरोधी असल्याने ते तात्काळ रद्द करण्याबाबत आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील हमाल तोलार एक दिवस कामकाज बंद ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी होऊन मोर्चा काढणार आहेत.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता चार हुतात्मा पुतळ्यापासून या मोर्चाची सुरुवात होणार होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा येणार आहे.