करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात काल (मंगळवारी) अत्यंत चुरशीने मतदान झाले. वंचितचे रमेश बारस्कर यांच्यासह ३२ उमेदवार येथे रिंगणात होते. मात्र खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील व महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातच झाली असल्याचे दिसले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी अंदाजित 59.87 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात माढा, करमाळा, माळशिरस, फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे 19 लाख 91 हजार 454 मतदार आहेत. यामध्ये 10 लाख 35 हजार 678 पुरुष, 9 लाख 55 हजार 706 स्त्री मतदार आहेत तर ७० तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात करमाळा 55, माढा 61.13, सांगोला 59.94, माळशिरस 60.28 फलटण 64.23, माण 58.42 मतदान झाले आहे.
मतदान झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते कोणाला कोणाचे मतदान पडले याची आकडेवारी काढण्यात व्यस्त झाले आहेत. भाजपची उमेदवारी निंबाळकर यांना सुरुवातीलाच जाहीर झाली होती. त्यानंतर मोहिते पाटील समर्थक नाराज झाले होते. सुरुवातीला भाजपला ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या निवडणुकीत रंगत आली होती. भाजपविरोधी लाट आणि पवार व ठाकरे यांच्याबाबतची सहानुभूती यावर ही निवडणूक गाजली. सुरवातीला भाजपकडून राष्ट्रीय मुद्दे मांडले गेले मात्र, शेवटच्या क्षणी स्थनिक मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
भाजपचे निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या या मतदारसंघात पाच सभा झाल्या होत्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा झाली होती. नितीन गडकरी यांचीही येथे सभा झाली होती. मोहिते पाटील यांच्यासाठी शरद पवार यांची करमाळ्यात एक सभा झाली होती. निंबाळकर यांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला होता, तर मोहिते पाटील यांना मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतरचाच वेळ मिळाला होता. त्याआधी त्यांनी मतदारसंघाचा दौरा केला होता. मात्र तेव्हा त्यांचे चिन्ह कोणते हे स्पष्ट नव्हते.
निवडणुकीत निंबाळकर यांच्याबरोबर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील व माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा पाठींबा होता. मोहिते पाटील यांना करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचा पाठींबा होता. सांगोल्याचे अनिकेत देशमुख, माळशिरसचे उत्तमराव जानकर, रामराजे निंबाळकर, माजी आमदार जयवंतराव जगताप, करमाळ्यातील बागल गट यांच्या भूमिका या निवडणुकीत महत्वाच्या आहेत.
मतदान झाल्यानंतर आता सर्व सर्व गटाचे कार्यकर्ते आपल्याला किती मतदान झाले यांची आकडेवारी जोडण्यात व्यस्त झाले आहेत. काही दिवसात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यावर याचा काही फरक पडणार का हे पहावे लागणार आहे. आपल्याला कसे जास्त मतदान होईल यावर गावपातळीवर अनेकांनी भर दिला असल्याचे दिसत आहे. तर काहींनी तालुका पातळीवरील नेत्यांचा आदेश पळत मतदान केले आहे. काहींनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तर काहींनी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे. अनेकांकडून दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. मात्र निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.