After six months not a single person will need to go to a government office

सोलापूर : राज्य व केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत आहे. सरकार पुढील सहा महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाइन करणार असल्याने एकाही सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

अनगर येथे दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, बबनदादा शिंदे, राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, अभयसिंह शेळके पाटील, प्रकाश चवरे, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा सुरू केल्याने या योजनेचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. महसूल विभागाने सुरू केलेल्या सलोखा योजनेच्या माध्यमातून शेती विषयक अनेक समस्या सोडवल्या जात आहेत. शेत रस्ते, पाणंद रस्ते निर्माण केले जात आहेत. पशुसंवर्धन विभागाने गोसेवा कायदा आणल्याने देशी गाईंच्या संवर्धनाला प्रोत्साहन मिळत आहे. तसेच लंपी आजार आल्यानंतर राज्यातील सर्व गोवांशिय जनावरांचे लसीकरण मोफत करण्यात आले. देशात मोफत लसीकरण फक्त आपल्या राज्यातच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढील काळात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात मोजणीची प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे त्वरित निकाली निघणार आहेत. अद्यावत तंत्रज्ञाने मोजणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 25 ते 30 रोव्हर उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात रोव्हर कमी पडत आहेत त्या जिल्ह्यांनी नियोजन समितीच्या निधीतून रोव्हर खरेदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिली.

अनगर येथील नागरिकांची मागणी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी 1 येथे निर्माण करण्यात आलेले असून त्या कार्यालयाचे आज उद्घाटन झाल्याची घोषणा महसूल मंत्री विखे पाटील यांनी केली. तर अनगरला अप्पर तहसील कार्यालय ही मंजूर करत असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

प्रारंभी माजी आमदार राजन पाटील यांनी प्रास्ताविक केले. मोहोळ तालुक्यात 104 गावे असून अनगर येथे दुय्यम निबंधक कार्यालय करण्याबाबत लोकांची मागणी होती व ते लोकांसाठी आवश्यक होते असे सांगून हे कार्यालय येथे दिल्याबद्दल त्यांनी शासन व महसूल मंत्री यांचे आभार मानले. यावेळी आमदार यशवंत माने यांनी महसूल भवन इमारतीसाठी पंधरा कोटीच्या निधीची मागणी केली तसेच मोहोळ येथे प्रशासकी इमारतीसाठी 25 कोटीचा निधी उपलब्ध असल्याचेही सांगितले. तर आमदार राजेंद्र राऊत यांनी पशुखाद्य व दुधाच्या दरात खूप मोठी तफावत असून दुधाला जादा दर देण्याची मागणी केली.

अनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनगर येथे नव्याने निर्माण केलेल्या दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाचे उद्घाटन फित कापून व नामफलक अनावरण करून करण्यात आले. यावेळी श्री. विखे पाटील यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाची पाहणी करून या कार्यालयामार्फत सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत गतिमान पद्धतीने सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे निर्देश दिले. यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *