करमाळा (सोलापूर) : वाशिंबे येथील श्री शरदचंद्रजी पवार विद्यालयात २००८ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व स्नेहसंमेलन झाले. शनिवारी (ता. 27) सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. माजी विद्यार्थ्यांना परत एकदा शाळेचा अनुभव देण्यासाठी राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्री. यादव, श्री. कांबळे, श्री. शिंदे, पवार व घोडेस्वार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. दरम्यान, मेळाव्यास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणी सांगितल्या. आता विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, भविष्यात पुन्हा सर्वांनी एकत्र यावे, असा मानस व्यक्त करून सर्वांनी आपला परिचय करून दिला. मनसोक्त गप्पा मारल्या. एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविषयी माहिती दिली. सध्या कोण काय नोकरी, व्यवसाय करतोय, याबाबत सांगितले.
तत्कालीन दहावीच्या मित्र व मैत्रीणी आज प्रगतीशील शेतकरी, दुध उत्पादक, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि अनेकांना गहिवरून आले. गतकाळातील जुन्या आठवणींना उजाळा देत मेळावा सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संयोजन समितीचे दीप्ती झोळ, माधुरी घोगरे, गणेश शिंदे, महावीर झोळ, तहसीलदार रणजीत कोळेकर, अॅड. दादा नरुटे, पुणे पोलिस प्रदीप तनपुरे, अॅड. तुषार वाघमोडे, शहरअध्यक्ष, मनसे पांडुरंग लोखंडे, अश्रू कानडे, नवनाथ जाधव, शिवाजी टापरे, रमेश झोळ, महेश झोळ, बंडोपंत पाटील, डोळेकाका यांनी स्वयंस्फूर्तीने कार्यक्रमाच्या विविध जबाबदाऱ्या उचलून कार्यक्रम उत्साही पद्धतीने पार पाडला.