करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे निलजग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बागल व पाटील गट युतीचे अंकुश शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. धंनजय झिंजाडे यांनी राजीनामा दिल्यानंतर येथील सरपंचपदाची जागा रिक्त झाली होती. तेथे आज (मंगळवारी) निवडणूक निर्णय अधिकारी श्री. बनसोडे या यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली. यावेळी धनंजय झिंजाडे यांच्यासह उपसरपंच दीपाली जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनीता झिंजाडे, दीपाली झिंजाडे, जनाबाई शिंदे, सुनीता गायकवाड, रेखा झिंजाडे, संजय जाधव, संतोष ठोबरे, रघुनाथ जाधव, विठ्ठल शिंदे, राणी काळे उपस्थित होते.
माजी सरपंच धनंजय झिंजाडे म्हणाले, निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे वरिष्ठांचा आदेश मानून राजीनामा दिला. सरपंचपदाच्या काळात बागल, पाटील गटासह जगताप व शिंदे गटाच्या सदस्यांनीही मला गावचा विकास करण्यासाठी मोठी साथ दिली. त्यामुळे गावात अनेक कामे करता आली. भविष्यातही गावच्या विकासासाठी सरपंच व प्रशासन यांना सहकार्य राहणार आहे.