करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने करमाळा शहरातील राजकीय फ्लेक्स, पक्षाचे झेंडे काढून टाकण्याची कारवाई केली आहे. आज (शनिवार) सकाळपासूनच नगरपालिकेचे कर्मचारी प्लेक्स काढताना दिसत होते.
करमाळा शहरात चौकाचौकात प्रमुख रस्त्यांवर राजकीय पदाधिकारी, काही राजकारणाशी संबंधित व्यक्तींचे व संस्थांचे फ्लेक्स लागलेले होते. त्यामधून प्रचार केला जात आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
शनिवारी नगरपालिकेचे कामकाज बंद असल्याने कर्मचारी सुट्टीवर होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांची जबाबदारी असलेल्या भागात कारवाई केली आहे. आचारसंहिता सुरु झाल्याने राजकीय पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांसह अन्य व्यक्ती, संस्थांचे फेक्स, बॅनर, बोर्ड काढून टाकण्यात सुरुवात झाली आहे. आचारसंहितेच्या काळात आयोगाची परवानगी न घेता फ्लेक्स, बॅनर लावल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.