करमाळा (सोलापूर) : राज्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा इरादा पक्का करत मुंबई येथील वायबी सेंटर येथे शरद पवार यांची तर सिल्वरओक येथे खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे.
खुपसे पाटील म्हणाले, देशाचे कृषिमंत्री कोण? हे आजही अनेकांना माहित नाही. मात्र कृषिमंत्री हा शब्द उच्चारताच शरद पवार यांचा चेहरा समोर दिसतो. पवार यांनीच राज्यसह देशातील सर्वोच्च असलेली कर्जमाफी केली होती. यामध्ये लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला होता. यावेळी ना कोणत्या अटी होत्या ना कोणते नियम. त्यानंतर कोणतीच कर्जमाफी कोणत्याच सरकारने घेतली नाही. पवार आजही बांधावर उतरून शेतकऱ्यांची आपुलकीने विचारपूस करतात. त्यामुळे आपण राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढे बोलताना खूपसे पाटील म्हणाले, पवार यांच्याशी शेती, पाणी, पाऊस आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान खासदार सुळे यांचीही भेट घेतली आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवू, असे आश्वासन सुळे यांनी दिले असल्याची त्यांनी सांगितले. यावेळी विनिता बर्फ, रोहण नाईकनवरे, हर्षवर्धन पाटील, शर्मिला नलावडे, निखिल नागणे, भारती पाटसकर, विशाल पाटसकर, केशव लोखंडे आदी उपस्थित होते.