करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी काढण्यात आली होती. या दिंडीत नर्सरीपासून पाचवीपर्यंतच्या बालचमूंनी सहभाग नोंदवला होता. पालखी पूजन, प्रतिमापूजन, विठ्ठल- रुक्मिणी आरती घेऊन बालदिंडीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. तुकाराम महाराज वैकुंठ गमन देखावा यावेळी बालदिंडी सोहळ्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
या देखाव्यामध्ये प्रत्यक्ष तुकाराम महाराज गरुडावर बसून विठ्ठलाच्या भेटीला जात असल्याचा देखावा सादर करण्यात आला. महाराष्ट्रातील दोन वीर ज्यांनी समाजाला सामाजिक एकतेचा व परिवर्तनाचा संदेश दिला. संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज बाल दिंडी कार्यक्रमाच्या निमित्त साधून गुरु शिष्य भेटीचा प्रसंग साकार करण्यात आला होता.
हा भेटीचा प्रसंग नाटकाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दुसरीच्या बाल कलाकारांनी केला. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान व वृक्षतोड करू नका, झाडे लावा हा संदेश देत झाडे लावा झाडे जगवा हे नाटक सादर केले. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी भक्तीपर गीतावर टाळ सादर केला. इतरही कलाकारांनी अभंग, गवळण, भारुडे गायली. प्रे प्रायमरीच्या व पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलभक्ती गीतावर नृत्य सादर केले. संस्थेचे संस्थापक नितीन भोगे व सौ. भोगे यांनी या सोहळ्याचे कौतुक केले.