सोलापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याच्या नावे स्वतःची शेतजमीन व फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम योजनेमध्ये ड्रॅगन फ्रुट, सुट्टी फुले, मसाला पिके, फळबागा पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर, मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर २० एचपी पर्यंत, पॉवर टिलर ८ एचपी पेक्षा जास्त, पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, स्थायी /फिरते विक्री केंद्र – शीत चेंबरच्या सुविधेसह, द्राक्ष पिकासाठी कव्हर व भाजीपाला रोपवाटीका घटकांचा योजनेत समावेश आहे. अधिक माहितीसाठी संबंधितांनी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.