सोलापूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत असून, आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी ३ ते ५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील, त्या तीनचाकी वाहन मालकांनी ३ ते ५ जुलै या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या दरम्यान अर्ज सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्जासोबत कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः केवळ क्र. १६ अन्वये जारी झालेला डी डी जमा करावा. सदर डीडी फक्त “Dy R.T.O. ” यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्युल्ड बँकेचा असावा.
अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५ अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल (उदा. आधार कार्ड, टेलिफोन बिल इ.) Solapur एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक ०६ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल, त्यांनी दि. ०७ जुलै रोजी सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला डीडी रुपये ३०० पेक्षा कमी रकमेचा नसावा. सदर डीडी फक्त “Dy R.T.O. Solapur” यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्युल्ड बॅंकेचा असावा. डीडी कमीत कमी एक महिना मुदतीमध्ये असावा.
दिनांक ०७ जुलै रोजी दुपारी ०३.०० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल, त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही, नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल.
कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही. वाहन धारकाने एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयात डी.डी.जमा केल्यास सदर बाबीस कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.