करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या विहिरींमध्ये लक्ष घातले जाईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. करमाळा तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या विहिरींचा विषय सध्या चर्चेचा झाला आहे. काही कर्मचारी अडवणूक करत आहेत. मात्र अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याची अनेक नागरिकांनी तक्रार केली आहे.
करमाळा पंचायत समितीचा अजब करभार! ‘प्रहार’ची तक्रार दाखल, कायदेशीर विहिरीत अडवणूक मग बेकायदाला परवानगी कशी दिली?
राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र करमाळा तालुक्यात लाभार्थ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. बिटरगाव श्री येथील विहिरीबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक लाभार्थी तक्रार करण्यासाठी पुढे आले आहेत.
लाभार्थ्यांचे नदीच्याकडेला क्षेत्र असल्याची करमाळा पंचायत समितीमधील फाळकेंना ‘ऍलर्जी’! काय आहे वास्तव?
करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी याबाबत मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ‘प्रहार’चे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी हा विषय आमदार बच्चू कडू यांनाही कळवला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांना निवेदनही दिले आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, सावंत गटाचे सुनील सावंत आदींनी या विषयात लक्ष घातले आहे.
करमाळा तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामात पैसे मागितले जात असल्याची तक्रार आहे. याशिवाय कामात दुजाभाव करत अडवणूक केली जात आहे. काही ठिकाणी अतिक्रमणात विहीर करण्यासाठी परवानगी दिलेली असताना दुसरीकडे स्वतःच्या शेतात विहिरी खोदण्यासाठी परवानगी कशी दिली? काही लाभार्थ्यांची प्रकरणे दाखल करूनही त्यांना मंजुरी का दिली नाही? अशा अनेक तक्रारी असून संबंधित कर्मचाऱ्यांची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. हा संपुर्ण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांना सांगण्यात आला आहे. त्यावर ‘या प्रकरणात लक्ष घातले जाईल’, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्या काय भूमिका घेतील आणि लाभार्थ्यांना न्याय मिळणार का हे पहावे लागणार आहे.