सोलापूर : विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान जिल्ह्यातील शाळांमध्ये राबवण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे आवाहन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
राज्य सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 712 शाळांतून 8 लाख 4 हजार 553 विदयार्थी अशा सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी, व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठीं गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी व यांची बैठक घेण्यात आली. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांची सहविचार सभा घेण्यात आली होती.
या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विविध उपक्रमांचे आयोजन ४५ दिवसांत करणे आवश्यक राहील. अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या आयोजनासाठी ६० गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखूमुक्त, प्लास्टिकमुक्त शाळा अशा उपक्रमांसाठी ४० गुण असे एकूण १०० गुण देण्यात येतील. विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमध्ये शाळा व परिसराच्या सौंदर्गीकरणासाठी १० गुण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णयप्रक्रियेतील सहभागासाठी १५ गुण, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्त्तिमत्त्व विकासासाठी १० गुण, शाळेची इमारत व परिसर स्वच्छतेसाठी १० गुण, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपक्रमास ५ गुण तसेच विविध क्रीडास्पर्धाच्या आयोजनासाठी १० गुण असे गुणांकन देऊन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येऊन पारितोषिके देण्यात येतील.
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत माननीय मुख्यमंत्री यांचे शुभेच्छा संदेश पत्र सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांपर्यंत वितरित केले जात असल्याचेही प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.