करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारकडून वांगीचे विभाजन करुन वांगी १, २, ३ व ४ अशा स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण करुन महसुली गावाचा दर्जा दिला. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूमापन क्रमांक बदलून चार ही गावांचे युनिक कोड नव्याने देण्यात आले आहेत. परंतु अद्याप सातबारा नुतनीकरणाची कामे प्रलंबित आहे. त्यामुळे सोलर पंपासाठी आँनलाईन अर्ज करण्यासाठी अडचण येत. त्याचा परिणाम होणार असून याकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी वांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय रोकडे यांनी केली आहे.
डॉ. रोकडे म्हणाले, विभाजना पूर्वी वांगी गृप ग्रामपंचायतीचा एक कोटीहून अधिक निधी मागील एक वर्षापासून वर्ग करण्यावाचून पडून राहीला आहे. त्यामुळे नव्याने निर्माण झालेली गावे विकास कामांपासून वंचित राहीली आहेत. वांगी १, २, ३ व ४ ग्रामस्थांना याचा फटका बसत असून विकास कामांना खिळ बसली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ सातबारा उताऱ्यावरील त्रूटी व पूर्वीच्या ग्रामपंचायतीचा निधीचे वाटप करावा अन्यथा प्रशासनास वांगी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.