करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी करमाळ्यात सुरु असलेल्या साखळी उपोषणामध्ये आज (बुधवारी) बिटरगाव श्री, मांगी व वडगाव उत्तर येथील समाज बांधवानी सहभाग नोंदवला. मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून पाठींबा मिळत आहे. आरक्षणावर तोडगा निघत नसल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत असून तालुक्यातील गावागावातून समाज बांधव करमाळ्यात उपोषणस्थळी भेट देऊन सहभागी होत आहेत.
करमाळा तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व बहुजन समाजाने साखळी उपोषण सुरु केले आहे. यामध्ये तालुक्यातील रोज दोन गावातील समाज बांधव सहभागी होत आहेत. या आंदोलनात रोज सायंकाळी श्रीदेवीचामाळ व करमाळा शहरातील समाज बांधव उपोषणस्थळी असतात. या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठींबा दिला आहे.
करमाळा तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचे अपवाद सोडले तर सर्व गावांनी पत्र दिले आहेत. करमाळ्यात सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा सातवा दिवस आहे. जरांगे ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे करमाळ्यात समाज बांधवांचे शांतते आंदोलन सुरु आहे.