करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी करमाळ्यात साखळी उपोषण सुरु आहे. त्यातच सातोली येथील मराठा समाज बांधवांनी आज (बुधवारी) मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देत महिला अन्नत्याग करणार आहेत, असे निवेदन दिले आहे. आरक्षणावर तोडगा निघत नसल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत असून तालुक्यातील गावागावातून समाज बांधव करमाळ्यात उपोषणस्थळी भेट देऊन सहभागी होत आहेत.
करमाळा तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व बहुजन समाजाने साखळी उपोषण सुरु केले आहे. त्यातच सातोली येथील सकल मराठा समाजाने तहसीलदारांना निवेदन दिले असून त्वरित तोडगा काढावा अन्यथा शुक्रवारपासून (ता. ३) सातोलीतील सर्व महिला अन्नत्याग करणार आहेत. जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला सर्वस्तरातून प्रतिसाद मिळत आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठीच सातोलीत आंदोलन केले जाणार आहे.