करमाळा (सोलापूर) : करमाळा आगारातून जेऊर ते पुणे अशी एसटी बस सुरु करण्यात यावी, अशी मागणी जेऊर प्रवासी संघटनेने केली आहे. याबाबत करमाळा आगार प्रमुख होनराव यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान लवकरच ही एसटी बस सेवा सुरु करू असे आश्वासन दिले असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ही एसटी बस सुरु झाली तर बारामती, पुणे येथे शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांना व या भागातील पुण्याला जाणाऱ्या नागरिकांना फायदा होणार आहे. निवेदन देतेवेळी प्रवासी संघटनेचे अधक्ष सुहास सुर्यवंशी, उपाध्यक्ष प्रवीण करे, सदस्य राजकुमार राठोड, अल्लाउद्दीन मुलानी, सलीम पठाण, बाळासाहेब गरड उपस्थित होते.
जेऊर- पोफळज- उमरड- मांजरगाव- वाशिंबे चौफुला- पारेवाडी सबस्टेशन- हिंगणी- भगतवाडी- जिंती बायपास- रामवाडी- बाबळगाव- खेड- भिगवण- पुणे (स्वारगेट) या मार्गे ही बस सेवा सुरु करावी. जेऊर येथून सकाळी 7.30 वा. पुण्याच्या दिशेने बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. जेऊर ते पुणे बस सेवा सुरू झाल्यास जेऊर परिसरात संपर्क असणाऱ्या 20 ते 25 गावांना याचा फायदा होणार आहे. स्वारगेट (पुणे) येथून दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास जेऊरच्या दिशेने ही बस सोडण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.