करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईबाबत आमदार नारायण पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागु नये म्हणून नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. याकडे गांभीर्याने पहा दुर्लक्ष करू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. आमदार पाटील यांची ही पहिलीच आढावा बैठक होती. यामध्ये अधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपाने बैठक गाजली. सरपंच व ग्रामसेवकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या.
तहसिलदार शिल्पा ठोकडे, माजी सभापती अतुल पाटील, माजी सदस्य राहुल सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, बहुजन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम, बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल, प्राचार्य जयप्रकाश बिले, विकास गलांडे, प्रा. अर्जुनराव सरक आदी यावेळी उपस्थित होते. तहसिलदार ठोकडे यांनी गेल्यावर्षीचा पाणी टंचाईचा आधार घेऊन प्राप्त अहवालानुसार तालुक्यातील सद्यस्थिती मांडली. या बैठकीत माहिती देताना संबंधित विभागप्रमुखांना योग्य ती माहिती प्रत्यक्षस्तरावर अथवा गावभेटी करुन घ्यावी आणि १० दिवसाच्या आत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.
आमदार पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाने दक्ष राहून उद्याच्या पाणी टंचावर मात करण्यासाठी आताच योग्य कार्यक्रम हाती घ्यावा. आमदार म्हणुन आपणास हवे ते सहकार्य केले जाईल पण यातुन नागरिकांच्या प्रश्नांची हेळसांड झाली नाही पाहिजे. जलजीवन योजनांच्या बाबतीत सर्व माहिती घेऊन एका समितीद्वारे प्रत्यक्षात कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली जाईल. यात दोषी सापडलेल्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
या बैठकीत अनेक गावातील सरपंचांनी आपल्या गावातील समस्या मांडल्या. महसुल, पाणीपुरवठा उपअभियंता निहाल शेख, महावितरणचे कलावते, कुकडी डावा कालवा, पाटबंधारे, पंचायत समिती आदि विभागातील प्रमुख अधिकाऱ्यासह ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, ग्राम महसुल अधिकारी यावेळी उपस्थित होते.