करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनाच निवडून द्या. मी त्यांच्याबरोबर कायम राहणार असून तुम्ही त्यांची साथ सोडू नका, असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत दहिगाव उपसा सिंचन योजनेवरील बंद नलिका वितरण प्रणालिचे भूमीपूजन आज (मंगळवार) साडे येथे झाले. यावेळी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, मांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुजित बागल, घोटीचे सरपंच विलास राऊत, अधीक्षक अभियंता धीरज साळी, निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर, बिटरगाव श्री येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव मुरूमकर, कार्यकारी अभियंता एम. टी. जाधवर आदी उपस्थित होते.
माजी आमदार जगताप म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण उभारणीत स्व. नामदेवराव जगताप यांचा मोठा वाटा आहे. या योजनेसाठी मी आमदार असताना प्रयत्न केले. स्व. दिगंबरराव बागल, त्यानंतर स्व. दिगंबरराव बागल, माजी आमदार शामल बागल, माजी आमदार नारायण पाटील यांनीही प्रयत्न केले. मात्र तालुक्यातील राजकीय विरोधामुळे हे काम रखडले.आमदार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे हे काम पूर्णत्वास आले असून तालुक्याचा विकास करण्यासाठी मी त्यांच्यबरोबर आहे. यापुढेही त्यांच्याबरोबर कायम राहणार असून तुम्हीही साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान करमाळा तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कधीच कमी पडणार नाही, असे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले आहे.
कुकडी डावा कालवाचे उपकार्यकारी अभियंता एस. के. आवताडे यांनी प्रास्ताविकात योजनेची माहिती दिली. देविदास तकमोगे म्हणाले, या योजनेसाठी दिगंबरराव बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप, सांगोल्याचे गणपतराव देशमुख, माजी आमदार नारायण पाटील, आनंद कोठडीया तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर आदींचे या योजनेत सहभाग आहे. आमदार शिंदे यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करुन विस्तारीकरण केले. घोटीचे सरपंच विलास राऊत म्हणाले, योजनेतील शेवटच्या गावाला बंद नलिकेमुळे पाणी मिळणार आहे. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. तानाजीराव मस्कर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साखरे यांनी तर आभार डॉ. विकास वीर यांनी मानले.