पुणे : भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘संविधान सन्मान दौड 2023’चे आयोजन रविवारी 26 नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (BARTI), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. या मिनी मॅरेथॉनमध्ये 50 देशातील विद्यार्थ्यांसह पुणे शहर, जिल्हा, महाराष्ट्र व देशाच्या विविध भागातील पाच हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेचे अध्यक्ष व ‘संविधान सन्मान दौड’चे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे विभाग प्रमुख डॉ. विजय खरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थाच्या (BARTI) कार्यालयीन अधीक्षक डॉ. संध्या नारखेडे, प्रा. विजय बेंगाळे, राहुल डंबाळे, दीपक म्हस्के आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘संविधान सन्मान दौड 2023’च्या जर्सीचे (T- shirt) अनावरण करण्यात आले.
परशुराम वाडेकर म्हणाले, संविधान सन्मान दौडचे यंदा दुसरे वर्ष आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे नांव नोंदणीतून दिसते. 26 नोव्हेंबरला संविधान सन्मान दौडची सुरुवात सकाळी 5.30 वा. सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातून होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी Preamble to the Constitution of India (भारतीय संविधानाची उद्देशिका) वाचन होणार आहे. वाचनामध्ये दौडचे स्पर्धक आणि सामान्य नागरिक असे सुमारे 15 हजार नागरिक सहभागी होणार आहेत. तर स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, अभय छाजेड, राजेश पांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान स्पर्धेच्या निमित्ताने ‘आयर्नमॅन’चा दोन वेळा किताब मिळवणारे आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांचा विशेष सन्मान होणार आहे. पुण्यातील 5 आंतरराष्ट्रीय धावपटूंचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांना 24 आणि 25 नोव्हेंबर 2023 रोजी जर्सीचे वाटप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जोशी गेट जवळच्या विपश्यना केंद्रातून दुपारी 3 ते 5 यावेळेत करण्यात येणार असल्याचेही वाडेकर यांनी सांगितले.
डॉ. विजय खरे म्हणाले, ‘संविधान सन्मान दौड 2023’साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे खाशाबा जाधव मैदान सर्व सोई सुविधांसाह सज्ज झाले आहे. स्पर्धेत विद्यापीठाच्या इंटरनॅशनल सेंटरच्या मुलांसह विद्यापीठ कॅम्पस आणि संलग्न महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. डॉ. संध्या नारखेडे यांनी सांगितले की, ‘संविधान सन्मान दौड 2023’मध्ये बार्टीचे समतादूत तसेच पोलिस भरातीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आमचे सहकार्य आहे.
‘वॉक फॉर संविधान’ रॅली
भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘संविधान सन्मान दौड 2023’मध्ये सहभाग घेण्यासाठी पुणेकर उत्सुक आहेत. तसेच या स्पर्धेत धावू शकणार नाहीत अशा महिला ‘वॉक फॉर संविधान’ करणार आहेत. या वॉकची सुरुवात 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार आहे. पुढे जाऊन वॉकमधील सहभागी महिला विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि विद्यापीठातीलच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ‘वॉक फॉर संविधान’ रॅलीचा समारोप होणार आहे.