राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने विधानसभेत कोणाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवारांची चाचपणी सुरु केली असल्याचे चित्र आहे. सोलापूर मध्य, सांगोला, मोहोळ व करमाळा या विधानसभा मतदारसंघात ताकदीचा उमेदवार शोधला जात असून येथे नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः याची चाचपणी करत आहेत, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील चार मतदारसंघात उमेदवारीचा दावा करू शकतात. यामध्ये सांगोला येथील शहाजीबापू पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात आहे. करमाळा तालुक्याची जागा शिवसेनेची आहे. येथे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिंदे यांना पाठींबा जाहीर केलेला आहे. ते येथील उमेदवारीसाठी दावा करतील. त्याबरोबर आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे देखील उमेदवारीसाठी आग्रह धरतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार हे पहावे लागणार आहे.
सोलापूर मध्य मतदासंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मोहोळ तालुक्यात देखील शिंदे गट उमेदवारीसाठी दावा करत आहे. येथे नागेश होनकळसे, सोमेश क्षीरसागर व मनोज शेजवळ यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते. याशिवाय भरतशेट गागावले यांचे निकटवर्तीय असलेले उद्योगपती यांच्याही नावाची येथे चर्चा आहे. या चारही विधानसभा मतदासंघात नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची याची चाचपणी खासदार शिंदे हे स्वतः करत आहेत. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून ते जिल्ह्यातील मतदार संघातील आढावा घेत आहेत.
करमाळा तालुक्यात मंत्री सावंत यांच्या माध्यमातून कोणाला उमेदवारी मिळणार हे पहावे लागणार आहे. चिवटे यांना नुकतेच आदिनाथ कारखान्यावर प्रशासकीय संचालक मंडळात घेतले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षच्या माध्यमातून ते जनमानसात जात आहेत. येथे माजी आमदार नारायण पाटील यांची ताकद चांगली असून ते मोहिते पाटील समर्थक देखील आहेत. याशिवाय बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या गेल्या विधानसभा निवडणुकीत सावंत यांच्याच माध्यमातून उमेदवार होत्या. मात्र आता त्यांच्या उमेदवारीबाबत काय होणार हेही पहावे लागणार आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष असले तरी त्यांचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही चांगले संबंध आहेत. त्यामुळे येथील उमेदवारीबाबत काय होणार हे पहावे लागणार आहे. मात्र खासदार शिंदे यांनी जिल्ह्यातील मतदारसंघात लक्ष घातले असल्याने याकडे विशेष लक्ष आहे. चिवटे यांनी तालुक्यात विकास निधीही आणलेला आहे. त्यामुळे त्यांनीही येथील उमेदवारीसाठी दावा केला असल्याची माहिती आहे.
–अशोक मुरूमकर