करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी 282.75 कोटी निधीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यात करमाळा येथील कमलाभवनी मंदिराचा समावेश असून त्यासाठी पाच कोटी मिळणार आहेत, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शिखर समितीची बैठक झाली. त्यामध्ये उच्चाधिकार समितीने मान्यता दिलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन आराखड्याविषयी चर्चा होऊन त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली. लवकरच त्याचा सरकार निर्णय निघणार आहे. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्याच व करमाळा तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे आमदार शिंदे यांनी म्हटले आहे. या पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान महत्वाचे आहे, असे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल व येथून होणारे स्थलांतर थांबेल. त्यामुळे उजनी जलपर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा 282.75 कोटीचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील श्री कमलादेवी मंदिर (करमाळा), श्री सिद्धेश्वर मंदिर (सोलापूर), श्री शिवपार्वती मंदिर व शिवसृष्टी (अकलूज), श्री नागनाथ मंदीर, (वडवळ, ता. मोहोळ) व श्री सिद्धेश्वर मंदिर (माचणुर, ता. मंगळवेढा) येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा, माहिती फलक, स्वच्छतागृह व विश्रांतीगृह, बैठक व्यवस्था, निवारा शेड, पदपथ, पेव्हर ब्लॉक, कचराकूंडी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन केले जाणार आहे.