करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच यावर्षी करमाळा बाजार समिती बिनविरोध झाली. याशिवाय राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे यावर्षी करमाळा तालुक्याला पहिल्यांदाच तब्बल चौघांना जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. याबरोबर ‘आदिनाथ’वर प्रशासकीय संचालक म्हणून दोघांना व सल्लागार म्हणून पाच जणांना (तिघांनी पद नाकारले आहे.) संधी मिळाली आहे. सध्या लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ज्यांची पदांवर वर्णी लागली आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष लाभदायी ठरले असेच म्हणावे लागणार आहे.
जगताप गटाकडे बाजार समिती
तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची आणि कायम वादात असलेली करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती यावर्षी पहिल्यांदाच बिनविरोध झाली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील, बागल गट हे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आले. आमदार शिंदे यांनी जगताप गटाला पाठींबा दिला होता. अपवाद सोडला तर बाजार समितीच्या निवडणुकीत वाद झाल्याचा इतिहास आहे. मात्र पत्रकार अण्णा काळे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे ही बाजार समिती बिनविरोध झाली.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापनेपासून जगताप गटाच्या ताब्यात होती. गेल्या निवडणुकीत प्रा. शिवाजीराव बंडगर यांच्या बंडखोरीमुळे ही बाजार समिती बागल गटाच्या ताब्यात गेली. त्यामुळे वादही झाला होता. मात्र यावर्षी झालेल्या निवडणुकीत ही निवडणूकच बिनविरोध झाली आणि एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले गट एकत्र आले. त्यामुळे काही प्रमाणात राजकीय वातावरण सकारत्मक झाले आहे.
ही बाजार समिती निवडणूक बिनविरोध होत आहे. याची चर्चा सुरु झाली तेव्हा काही जणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांचा हात असल्याचे संगितले होते. तेव्हा ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने बाजार समिती बिनविरोध करणारा ‘किंग मेकर’ कोण असे वृत्त दिले होते. तेव्हा स्वतः जगताप यांनी याचा खुलासा करत ‘अशोकराव तुम्ही केलेल्या वृत्तातील बाजार समितीचे किंग मेकर हे तुमचे मित्र अण्णा काळे हे आहेत’, असे सांगितले होते. तेव्हा माजी आमदार नारायण पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, देवानंद बागल, पप्पू उकिरडे व विठ्लराव क्षीरसागर हे उपस्थित होते.
बाजार समिती बिनविरोध झाल्याने तालुक्यातील राजकारमधील कटुता काही प्रमाणात कमी झाली. बाजार समिती बिनविरोध होत आहे हे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टललाही माहित होते. मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन गोपनीयता ठेवण्यात आली होती. याबाबत काही वरिष्ठांशीही चर्चा सुरु होती. यावर्षी करमाळा तालुक्यात झालेला सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल म्हणून याकडे पहाणे आवश्यक आहे. यापुढे यावर्षीची आठवण म्हणून कायम हे उदाहरण दिले जाईल. हे घडत असताना आमदार शिंदे गटाची भूमिकाही महत्वाची होती.
जिल्हा नियोजन समितीबद्दल…
राज्यात गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर भाजप व शिवसेना (शिंदे) एकत्र आले. त्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. या सरकारमध्ये करमाळ्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दिलेले माजी आमदार नारायण पाटील व भाजपचे गणेश चिवटे यांना जिल्हा नियोजन समितीवर स्थान मिळाले. त्यानंतर काही दिवसातच राष्ट्र्वादीत फूट पडली आणि अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान पवार यांच्या सरकारमधील सहभागामुळे जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समितीवर संधी मिळाली. त्यात अजित पवार यांना नेते मानणारे करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांची शिफारस महत्वाची होती. त्यांच्या शिफारशीने ऍड. राहुल सावंत यांना जिल्हा नियोजन समितीवर संधी मिळाली. त्यानंतर काही दिवसातच मंत्री तानजी सावंत यांचे करमाळ्यातील विश्वासू समजले जात असलेले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचे बंधु महेश चिवटे यांनाही जिल्हा नियोजन समितीवर स्थान मिळाले. तालुक्यातील प्रश्न मंडण्याच्या दृष्टीने या निवडी महत्वाच्या मानल्या जात आहेत. माजी आमदार पाटील, चिवटे व अॅड. सावंत यांच्या रूपाने आणि सत्तातरमुळे करमाळा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यादाच जिल्हा नियोजन समितीवर चौघांना स्थान मिळाले आहे.
करमाळा तालुक्यात महत्वाचा असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरील संचालक मंडळ बरखास्त करून यावर्षी प्रशासक मंडळ आले. या प्रशासक मंडळावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे व संजय गुटाळ यांची वर्णी लागली. त्यांनी कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश आले नाही. कारखाना व्यवस्थित चालू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सल्लागार म्हणून पाचजणांची नियुक्ती केली. त्यात सर्व गटाच्या पाच कार्यकर्त्यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले. त्यातील हरिदास डांगे, डॉ. वसंतराव पुंडे व अच्युत पाटील यांनी जाहीरपणे पद नाकारले. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे व धुळाभाऊ कोकरे यांनी हे पद स्वीकारले असून आदिनाथला मदत करण्याचे जाहीर केले आहे.
अर्बन बँक निवडणूक आणि बरखास्त
करमाळा शहरातील अर्बन बँकेची निवणूक याच वर्षात झाली. मात्र बँकेची आर्थिक परस्थिती बिकट असल्याने निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच संचालक मंडळ बरखास्त झाले आणि प्रशासक नियुक्त झाले. सुरुवातीला प्रशासक म्हणून दिलीप तिजोरे यांनी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेतले. त्यामुळे त्यांची कारकीर्दही गाजली होती.
तहसील, पंचायत समिती प्रशासनाबद्दल…
यावर्षी करमाळा तहसीलचे समीर माने यांची बदली झाल्यानंतर प्रभारी तहसीलदार म्हणून विजयकुमार जाधव यांनी आठ महिने उल्लेखनीय काम केले. त्यानंतर शिल्पा ठोकडे यांची अतिरिक्त तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या रजेमध्ये राजाराम भोंग यांनी काम पाहिले. त्यानंतर पुन्हा राऊत हे नियुक्त झाले पुन्हा ते रजेवर गेले आता सारंगकर यांच्याकडे प्रभारी म्हणून पंचायत समितीचा पदभार आहे.
सत्ताबदलामुळे विकास कामांना निधी
राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेतल्यामुळे तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षण याचा विकास करण्यासाठी आमदार शिंदे यांना निधी आणण्यासाठी मदत झाली आहे. डिकसळ पूल, जातेगाव ते टेंभुर्णी, उपजिल्हा रुग्णालय असे प्रश्न यावर्षी मार्गी लागले आहेत. विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन पवार यांच्या माध्यमातून तालुक्याला निधी मिळत असल्याचे आमदार शिंदे हे सांगत आहेत.
चर्चेतले काही चेहरे…
मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, शिंदे गटाचे सुजित बागल, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, मकाई निवडणुकीत उतरलेले प्रा. रामदास झोळ, माजी सभापती अतुल पाटील, आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, रमेश कांबळे, दशरथ कांबळे, नागेश कांबळे, ऍड. अजित विघ्ने, सतीश नीळ, मनसेचे तालुकाध्य संजय घोलप, सचिन काळे, सुनील सावंत, चंद्रकांत सरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष चिंतामणी जगताप, प्रहारचे संदीप तळेकर, भीमदलाचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, बीआरएसचे अण्णासाहेब सुपनवर, माजी सभापती शेखर गाडे, राष्ट्रवादीचे हनुमंत मांढरे पाटील, ऍड. शिवराज जगताप, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, भाजपचे जगदीश अग्रवाल, आमरजित साळुंखे, अॅड. शशिकांत नरुटे, दीपक चव्हाण आदी चर्चेतले असे अनेक चेहरे आहेत. त्यातील ही काही नावे आहेत.