करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समिती व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी सामाजिक बांधिलकी जपत हृदयविकाराने मृत्यू झालेल्या राजुरी येथील तरुणाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. रवी हंबीरराव असे संबंधित तरुणाचे नाव होते, ते २४ वर्षाचे होते. राजुरी ग्रामपंचायतचे केंद्र चालक (कॉप्युटर ऑपरेटर) म्हणून ते काम पाहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले होते.
रवी हंबीरराव यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना आर्थिक मदत व्हावी या म्हणून सामाजिक बांधिलकी जपत करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या माध्यमातून करमाळा पंचायत समिती व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी त्यांना मदत केली आहे. एएसएसकेचे तालुका व्यवस्थापक आजिनाथ घाडगे यांच्यासह विस्तार अधिकारी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्या टीमकडून जमा झालेले 63 हजार 500 रुपये मदत म्हणून कुटुंबियांना देण्यात आले आहेत. हंबीरराव यांच्या कुटुंबियांना घर सोडून इतर कोणतीही मालमत्ता नाही. त्यांना जमीनही नाही. त्यांना एक भाव होता त्यांचेही कोरोना काळात निधन झाले होते. त्यांचे आई- वडील हे वृध्द आहेत. त्यामुळे त्यांना ही मदत देण्यात आली आहे.