करमाळा (सोलापूर) : सीना कोळेगाव धरणाचा पाणीसाठा सीना कोळेगाव प्रकल्प विभाग परांडा या कार्यालयास हस्तांतरण करून हे विभागीय कार्यालय बंद न करता सुरू ठेवावे, अशी मागणी सीना कोळेगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
नीळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘सीना कोळेगाव धरणाचा पाणी साठा सध्या पाटबंधारे विभाग क्र. १ धाराशिव या विभागीय कार्यालयाकडे आहे. हे कार्यालय परांडा येथून साधारण ८० किमीवर असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेण्यासाठी व विविध प्रकारच्या परवानग्या मिळविणेसाठी धाराशिव येथे जावे लागत आहे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्रास दायक आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा सीना कोळेगाव प्रकल्प विभाग परांडा यांच्याकडे हस्तांतरण करून हे विभागीय कार्यालय कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे व धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा. धरणग्रस्तांना न्याय न मिळाल्यास परांडा व करमाळा तालुक्यातील सर्वच धरणग्रस्त शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करतील’, असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे.
