करमाळा (सोलापूर) : अयोध्येत श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शेटफळ येथे टाळ- मृदंगाच्या गजरात प्रभू रामचंद्राच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये वारकऱ्यांचा मोठा सहभाग होता. महिलांनी आपल्या दारात आल्यानंतर औक्षण करून पूजा केली यानंतर राममंदिराच्या प्रांगणामध्ये बापू महाराज नाईकनवरे यांचे कीर्तन झाले. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आयोध्येमधील राम जन्माच्या ठिकाणी होत असलेल्या मंदिर निर्माण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास प्रतिसाद देत संपूर्ण गावांमध्ये दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. किर्तनानंतर दुपारी नागनाथ मंदिरांमध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

