करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वीट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाली आहे. येथे शिंदे, पाटील, जगताप व बागल या प्रमुख गटातील उमेदवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. ऐनवेळी येथे कोणाची युती होईल का? हेही पहावे लागणार आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार प्रस्थापितांविरुद्ध युवक अशी येथे चर्चा सुरु असल्याचे समजत आहे. ऐनवेळी काय होईल हे आता स्पष्ट नसले तरी जगताप गटाच्या भूमिकेकडेही लक्ष असेल.

वीट ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद हे एससी सर्वसाधारण निघाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार समाधान कांबळे, संजय चांदणे, बबलू गणगे, महेश गणगे, रमेश चांदणे, महेश चांदणे, सचिन गणगे, विशाल गणगे आदींची नावे सरपंचपदासाठी येथे चर्चेत आहेत. आता फक्त आरक्षण जाहीर झालेले असले तरी सर्व प्रभागात उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु होणार आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन सोईनुसार भूमिका घेतल्या जाऊ शकतात, असाही येथे एक सुर आहे.
पृथ्वीराज पाटील यांचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा! जेऊरचे आरक्षण जाहीर होताच सुरु झाल्या चर्चा

प्रभागनिहाय आरक्षण : प्रभाग क्रमांक १ मध्ये तीन जागा आहेत. येथे दोन सर्वसाधारण महिला व एक जागा सर्वसाधारणसाठी असेल. प्रभाग क्रमांक २ मध्ये तीन जागा असतील तेथे एक ओबीसी सर्वसाधारण, एक एससी महिला व एक सर्वसाधारण महिला असेल. वार्ड क्रमांक ३ मध्ये दोन जागा आहेत. यामध्ये एक सर्वसाधारण पुरूष व एक सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक चारमध्ये जागा दोन आहेत. त्यात एक सर्वसाधारण व एक ओबीसी महिला. प्रभाग क्रमांक पाचमध्ये तीन जागा असतील. त्यात एक एससी सर्वसाधारण, एक सर्वसाधारण व एक सर्वसाधारण महिला असे आरक्षण असेल. येथे १३ ग्रामपंचायत सदस्य व १ सरपंच यासाठी आरक्षण जाहीर झालेले आहे.
