करमाळा (सोलापूर) : दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. शिक्षण व आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबाबत यावेळी चर्चा झाली आहे. गोविंदबाग येथे ही भेट झाली. मालेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्रमोद शिंदे यावेळी उपस्थित होते.

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेबाबत यावेळी चर्चा झाली. शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक लावून देण्याचे त्यांनी सांगितले. बारावी नंतरचे सर्व खाजगी विद्यापीठे व इतर महाविद्यालयाची प्रवेशाची अंतिम तारीख एकच करणे, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकसारखी करणे, प्रवेश परीक्षाची संख्या कमी करणे, समुपदेशन फेरी पुन्हा सुरू करणे याबाबत चर्चा करून समस्या सोडवण्याची मागणी केली. याबरोबरच शिष्यवृत्तीमध्येही राज्यात सामाजिक आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत दिली जाते. सदरचे शुल्क सरकार संबंधित महाविद्यालयाला देत असते, परंतु बारा वर्षांपासून सदरची शुल्क देण्यामध्ये दिंरगाई होत असल्याने शैक्षणिक संस्थांना बँकांची देणे, सरकारचे कर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार, लाईट, पाणी, इंटरनेट व इतर मेंटेनेसची बिले वेळेस देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, बहुजन समाज कल्याण विभाग व इतर आणि विभागाचे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याची मागणी करण्यात आली.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धनगर समाजातील विद्यार्थ्यांना असणारी स्वयंम व स्वधार योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील व्यावसायिक महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्वयंम व स्वधार योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत महाराष्ट्र व केंद्र सरकार यांना वारंवार मागणी केलेली आहे. परंतु सदरचे आरक्षण न मिळाल्याने समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणून सध्या आरक्षण मिळेपर्यंतइतर समाज बांधवांप्रमाणे आरक्षणाशिवाय, मराठा समाजाला देता येऊ शकणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलती बाबत विविध मुद्द्याद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर, प्रा. रामदास झोळ, मंगेश चिवटे, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांच्या समवेत सह्याद्री अतिथी गृहावरती मीटिंग लावून मागणी करण्यात आली होती. याबाबतची माहिती पवार साहेब यांना प्रा. झोळ यांनी दिली.