सोलापूर : संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेंतर्गत पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुधारित बियाण्याचे मिनीकिट आधारित बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मिनीकिट भरडधान्य बियाणांचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, सन 2023 हे वर्ष जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. पौष्टिक तृणधान्य वर्ष या संकल्पने अंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, कोडो, राळा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्यांचे प्रमाण वाढविणे तसेच तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा प्रमुख हेतू आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढ करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत पौष्टीक तृणधान्य मिनीकिट वाटप व मिलेट क्रॉप कॅफेटेरिया बाबीची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे. यात सोलापूर जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्ह्यात शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमे अंतर्गत पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुधारित बियाण्याचे मिनीकिट आधारित बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
याबाबत कृषि विभागाने ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोदो व राजगिरा या भरडधान्यांचे मिनीकिट बियाणे महाबीज, सोलापूर व राष्ट्रीय बीज निगम पुणे यांच्याकडून भरडधान्यांचे एकूण 35150 मिनीकिटस् मागवण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय बीज निगम पुणेकडून खरीप ज्वारी एकूण 3615, बाजरी 7957, राजगिरा 1955 असे एकूण 13527 मिनीकिटस् तसेच, महाबीज, सोलापूर यांच्याकडून खरीप ज्वारी 6795, बाजरी 5063, राळा 5210, कोडो 2600, राजगिरा 1955 असे एकूण 21623 मिनीकिटस् ची मागणी करण्यात आली आहे. तरी या मिनीकिट भरडधान्य बियाणांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.