सोलापूर : २०२३- २४ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, तांत्रिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी कोणत्याही मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून शैक्षणिक प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम घेऊ नये, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीने समाजकल्याण कार्यालयामार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षि छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व विद्या वेतन या योजनांचा लाभ देण्यात येतो. या सर्व योजना शासनामार्फत Mahadbtmahait.gov.in या प्रणालीवरुन ऑनलाईन राबविण्यात येत आहेत.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून नवीन/ नूतनीकरणाचे प्रवेश करतेवेळी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात येणाऱ्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) माध्यमातून प्रवेश प्राप्त होणाऱ्या उमेदवारांना त्याच्या संवर्गाप्रमाणे शासन स्तरावरुन महाडीबीटी प्रणालीवरुन शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी पोर्टलव्दारे महाविद्यालयास दिली जाईल. त्यामुळे प्रवेशावेळी संबंधित विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/ महाविद्यालये/तंत्रनिकेतने यांनी कोणत्याही मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम घेऊ नये. तसेच कोणत्याही मागासवर्गीय विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही, याची योग्य दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची राहील. या सूचनेचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधितावर प्रचलित नियमानुसार प्रशासकीय वा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. याची सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे पत्रकात म्हटले आहे.