करमाळा (सोलापूर) : टेंभुर्णी- नगर महामार्गावर खडकेवाडी फाट्याजवळ पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या वारकऱ्यांच्या इकोची (कार) ट्रकला धडक झाली आहे. या अपघातात कारमधील सात वारकरी जखमी झाले आहेत. यातील जखमींवर करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. हा अपघात बुधवारी (ता. २८) मध्यरात्री पावणेएक वाजताच्या सुमारास घडला आहे.
या अपघातातील ट्र्क हा टेंभुर्णीकडून करमाळ्याकडे जात होता. तर वारकऱ्यांची कारही त्यांच्या मागे चालत होती. मात्र खडकेवाडी फाट्याजवळ आल्यानंतर ट्र्क चालकाने रस्त्याच्या परस्थितीकडे लक्ष न देता हयगयीने ट्र्क चालवत अचानक ब्रेक दाबून इंडिकेटर न देता वळण घेतल्याने वारकऱ्यांची कार मागून धडकली. यामध्ये काही वारकरी गंभीर तर काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत.
पारस विजयकुमार जैन (वय ३८, रा. बनोटी, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद), सिद्धांत सचिन महालपुरे (वय १४, रा. गोंदेगाव, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद), गणेश शिंदे (वय ४५, रा. हनुमंत केडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद), गोकुळ घुले (वय ४५, रा. पवरी, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद), साहिल महाराज कासार (वय २०, रा. चाळीसगाव, जि. जळगाव), संदीप पुंढलिक राठोड (वय २२, रा. हनुमंत केडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) व भूषण वैष्णव (वय २४, रा. शिर्डी, जि. नगर) अशी जखमींची नावे आहेत. यामध्ये कीर्तनकार सुदाम चिंदा सुरवसे (वय २३, रा. वरठाण, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी ट्र्क चालकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.