करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात १६ ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. त्यातील निकाल पाहिले तर तालुक्यात शिंदे गट वाढत आहे हे सिद्ध झाले आहे. जेऊर सोडले तर सर्व ठिकाणी शिंदे गटाचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यानेच गट वाढत आहे, येणाऱ्या काळात आणखी कसा गट वाढेल यावर भर दिला जाणार आहे, असे शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
बागल म्हणाले, २०१४ मध्ये शिंदे गटाचा तालुक्यात एकही साधा ग्रामपंचायत सदस्य देखील नव्हता. आता शिंदे गटाचे प्रत्येक गावात कार्यकर्ते झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जेऊर सोडले तर सर्व ठिकाणी शिंदे गटाचे सदस्य आहेत. पाच ठिकाणी शिंदे गटाचा सरपंच आहे. काही ठिकाणी शिंदे गटाला रोखण्यासाठी विरोधी गटाला एकत्र यावे लागले.
पुढे बोलताना बागल म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूका या स्थानिक पातळीवर होतात. त्यात कार्यकर्ते आपापल्या सोईनुसार भूमिका घेत असतात. मात्र आमदार शिंदे यांच्याकडून सुरु असलेल्या विकास कामांना मतदार स्वीकारत आहेत. त्यामुळे त्यांच्या गटाच्या सदस्य व सरपंचपदाच्या संख्येत वाढ होत आहे. ही संख्या वाढवण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करत आहे. भविष्यात आणखी ही संख्या वाढेल, असा विश्वास असल्याचे बागल यांनी सांगितले आहे.