सोलापूर : हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम झाल्यानंतर बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून लाच घेताना सरपंचाच्या पतीला सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सांगोला तालुक्यातील आलेगाव येथे ही कारवाई झाली आहे. यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सरपंच महिलेचा पती पांडुरंग रामचंद्र दिवसे (वय 51) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे (वय 43) यांचे ते पती आहेत.
यातील तक्रारदार हे कंत्राटदार आहेत. त्यांनी आलेगावमधील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम घेतले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर बिल मिळणेबाबत ग्रामपंचायत येथे पाठपुरावा करत असताना आलेगावच्या सरपंच दिवसे यांचे पती यांनी ८००० रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारीदार यांनी त्यांच्याकडे होत असलेल्या लाच मागणीबाबत अँटी करप्शन ब्युरो, सोलापूर येथे तक्रार दिली.
दरम्यान यातील संशयित आरोपी पांडुरंग रामचंद्र दिवसे यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचे दोन हजार व सध्याच्या कामाचे आठ हजार असे १० हजार लाच मागीतली. याबाबत महिला सरपंच यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी सदरची लाच रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे आज (गुरुवारी) यातील तक्रारदार यांनी महिला सरपंच यांचे पती यांची भेट घेऊन बिलाचा विषय काढला तेव्हा महिला सरपंचाचे पती यांना तक्रारदार यांच्याकडून १० हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
यावरून सांगोला पोलिस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीच्या पथकात पोलिस निरीक्षक (लाप्रवि) चंद्रकांत कोळी, पोलिस अंमलदार प्रमोद पकाले, गजानन किणगी, राहूल गायकवाड, शाम सुरवसे यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षक (लाप्रवि पुणे परिक्षेत्र) अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक (लाप्रवि, पुणे) डाॅ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. ‘आपणास कोणी शासकीय अधिकारी व कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा’, असे आवाहन सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश कुंभार यांनी केले आहे.