सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत बारावीची व 1 ते 26 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात 21 फेब्रुवारी ते 26 मार्च या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत कलम 144 (1) (3) चे आदेश लागू करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
या कालावधीत फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राभोवती 100 मीटर परिसरात असलेली झेरॉक्स केंद्र, फॅक्स, एसटीडी, आयएसडी बुध, ई- मेल, इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप, प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने यांचा वापर करण्यास बंदी आहे. तसेच सदर परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या 200 मीटर परिसरातील एसटीड, आयएसडी बुध, ई-मेल, इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप, प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत. हा बंदी आदेश विद्यार्थींना सोडण्यास आलेल्या पालकांना, केंद्र व्यवस्था पाहणाऱ्या परिक्षक, सुपरवायझर, शिपाई व शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींना लागू नाही.
परिक्षा कालावधीत परीक्षा केंद्राभोवती 100 मीटर परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे. हा बंदी आदेश परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थींना सोडण्यास आलेल्या पालकांना, केंद्र व्यवस्था पाहणाऱ्या परिक्षक, सुपरवायझर, शिपाई व शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींना लागू नाही. जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा आणि कामकाज सुयोग्य पध्दतीने होण्यासाठी व तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती कुंभार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार दंडनियम व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असेही आदेश नमुद केले आहे.