करमाळा (सोलापूर) : कोर्टी येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रिडा संकुल कुमठा नाका, सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत ही निवड झाली. या संघाने सुरवातीला सांगोला, मोहोळ या संघाचा सलग पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम स्पर्धेत या संघाने बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर (ता. मंगळवेढा) या संघाचा २९ गुणांनी पराभव करत विभागीय स्पर्धेवर आपले नाव कोरले. सपना मासाळ, मयुरी गोरे, साक्षी देवकते, साक्षी गोरे, ऐश्र्वर्या गोरे, प्रज्ञा आदलिंगे, प्रगती वायदंडे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या संघाला क्रिडा शिक्षक बाळासाहेब भिसे, कोच नवनाथ माने यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे चेअरमन डॉ. महेश अभंग, सचिव अॅड. अनुप अभंग, मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण शिंदे, बापुसाहेब शिंदे व कोर्टी ग्रामस्थांनी अभिनंदन केले. अनंत चतुर्थीच्या दिवशी ग्रामस्थांनी व पालकांनी विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार केला. विभागीय स्पर्धेसाठी या प्रशालेने हॅटट्रीक केली आहे.