मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषद व विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध विरोधकांनी गदारोळ करत आवाज उठवला. त्यानंतर हे कामकाज तहकूब करण्यात आले. विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची ओळख करून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील नऊ मंत्र्यांची सोडून इतर आमदारांना विरोधी बाकावर बसण्याची व्यवस्था करा, अशी मागणी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केली होती.
अधिवेशनासाठी विधानभवनात येताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नऊ मंत्री व त्यांना समर्थन देणारे आमदार यांनी एकत्र प्रवेश केला. दरम्यान शरद पवार समर्थक आमदारही विधानभवनात उपस्थित होते. जयंत पाटील, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, सुनील भूसारा, राजेश टोपे, सुमन पाटील, रोहीत पवार, मानसिंग नाईक व प्राजक्त तनपुरे हे नेते विरोधी बाकावर बसले.
राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. त्यातील नवाब मलिक हे तुरुंगात आहेत त्यामुळे सध्या ५२ आमदार आहेत. त्यापैकी अजित पवार गटाचे १५ तर शरद पवार गटाचे ९ आमदार विधानभवनात उपस्थित होते. एकूण २४ आमदार अनुपस्थित होते.